नंदुरबार | प्रतिनिधी
देशातील ८५ टक्के बहूजन समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. मात्र, बहूजन समाज संघटीत नाही, तो जेव्हा त्याच्यातील ताकद ओळखेल त्यावेळी तोदेखील मालक बनू शकेल, असे प्रतिपादन भिम आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय नेते ॲड. चंद्रशेखर आझाद यांनी केले.
भिमआर्मी एकता मिशन अंतर्गत दि.१९ नोव्हेंबरपासून भीमा कोरेगाव येथून सुरु होणारी संविधान जनजागृती यात्रा आज नंदुरबारात आली. त्यानिमित्त आयोजित सभेत श्री.आझाद बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, कोअर कमिटी मेंबर राजू झनके, राज्य संघटक दीपक भालेराव, कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, प्रभारी दत्तू मेढे, जिल्हाध्यक्ष संजू रगडे, उपाध्यक्ष रईसअली, अमोल पगारे, रवी रगडे, लोंटन पेंढारकर,
भैय्यासाहेब पिंपळे, मुन्ना येलमार, मौलाना जकारीया, मौलाना अखलाख, शाहेब शेख, राहूल प्रधान आदी उपस्थित होते. सुरुवातील नाटय मंदिरापासून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीत आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. या रॅलीचे रुपांतर तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात जाहीर सभेत झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुढे श्री.आझाद म्हणाले, भिमआर्मी भारत एकता मिशन अंतर्गत संविधान जनजागृती यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात काढण्यात येत आहे.


सदर जनजागृती यात्रेला दि. १९ नोव्हेंबरला भिमा कोरेगाव येथून सुरुवात झाली. ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होणार आहे. बहुजन समाजाचे लोक आजही गुलाम बनून राहत आहेत. गुलामाला काहीच किंमत नसते.ताकद नसते. भारतात अनेक सभ्यता, संस्कृती आहेत. त्यामुळे बाहेरच्यांना आपल्या देशात एकजुट आहे, असा भास होतो. प्रत्यक्षात तसे नाही. बहुजन समाज हा आतापर्यंत वंचितच राहिला आहे.
मागच्या सरकारच्या काळात भीमा कोरेगाव येथे बहुजनांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेतले जातील अशी या सरकारकडून अपेक्षा होती, पण अपेक्षाभंग झाला आहे. यासाठी आता आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागणार आहे.
बहुजनांच्या कल्याणासाठी भीम आर्मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे, यासाठी बलिदान द्यावे लागले तरीही बेहत्तर पण बहुजनांमधील गेलेला आत्मविश्वास पून्हा परत आणायचा आहे.
श्री.आझाद पुढे म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला आहे. त्यांनी शिक्षणासाठी आयुष्य वेचले म्हणून आजची स्त्री, महिला शिक्षण घेवू शकत आहे. त्यांच्या सन्मानार्थ दि. २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्मृतीदिनी शिक्षक दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ज्या देशात महिलांना बरोबरीचे स्थान दिले जाते, त्यांचा मानसन्मान राखला जातो त्या देशाला प्रगतीपासून कोणीही रोखू शकत नाही. यासाठी आता महिलांनाही त्यांचे योग्य स्थान देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आज संविधान बदलण्याची भाषा केली जाते. पण हा दिवस कधीही येणार नाही. कारण संविधानानेच आपल्याला विविध अधिकार दिले आहेत. ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनाची हाक दिली होती.मात्र, आपण आपल्यातील शक्ती ओळखणार नाही तर सामाजिक परिवर्तन कसे घडेल? यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. बहुजनांच्या हितासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी भीम आर्मीने सुरु केलेल्या या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.आझाद यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.अमोल पगारे यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष संजू रगडे यांनी मानले.








