नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे . आज दि.२३ रोजी तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक गौरव वाणी व भाजपातर्फे आ.अमरिशभाई पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.
तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक गौरव वाणी यांनी महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केला.यावेळी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, नंदुरबार जिल्हा प्रभारी पान गव्हाणे, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, नगरसेवक सुभाष चौधरी, ओबीसीसेलचे प्रदेश सरचिटणीस बापू कलाल, संजय वाणी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री.वाणी हे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे मी आज अर्ज दाखल केला आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांला संधी दिली आहे. आम्ही सर्व मिळून ही निवडणूक जोमाने लढवू व विजय प्राप्त करू असा मला विश्वास आहे. मला या धुळे – नंदुरबार विधानसभा निवडणुकी साठी संधी दिल्याबद्दल मी माझे मार्गदर्शक पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, यांना धन्यवाद देतो.
तसेच यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे अमरिशभाई पटेल यांनी देखील आज अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी पालकमंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावित, मंत्री सुभाष भामरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यावेळी उपस्थित होते.
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज २३ नोव्हेंबर रोजी शेवटची मुदत आहे .