नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बसस्थानकामधील जुन्या स्वच्छतागृहाच्या भिंतीला लागुन प्रवासी मार्गाच्या मधोमधच बेकायदेशीर अतिक्रमित दुकान शेड उभारुन अडथळा निर्माण करण्यात आला आहे. सदर अतिक्रमित दुकान शेडला बसस्थानकातील साईरचना प्लाझामधील सर्व व्यवसायिक दुकानदारांचा विरोध असुन सदरचे दुकान शेड काढण्याची मागणी करुन येत्या 24 तासात कार्यवाही न झाल्यास दुकाने बंद ठेवुन रस्त्यावर उतरण्याचा इशारा नंदुरबार बसस्थानकातील साईरचना प्लाझामधील सर्व व्यवसायिक दुकानदारांनी दिला आहे.
याबाबत नंदुरबारचे आगारप्रमुख मनोज पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार येथील बसस्थानक व साईरचना प्लाझा नियोजित आराखड्यानुसार बांधण्यात आलेले आहे. तसेच दुकानांसह प्रवासी बैठक व्यवस्था व वापर रस्ता तयार करण्यात आलेले आहे. परंतु बसस्थानकातील जुन्या स्वच्छतागृहाच्या भिंतीला लागुन नाथजलसाठी बेकायेदशीरपणे अतिक्रमित दुकानाचे शेड प्रवासी रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी धुळे, पुणे, मुंबई, पंढरपुर अशा लांबपल्ल्याच्या बसेस लागत असल्याने त्याठिकाणी प्रवाश्यांची गर्दी असते. संबंधित नाथजलसाठी ठेका घेतलेल्या व्यक्तीकडुन सदर ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पत्र्याचे शेड व काही स्वरुपात पक्के बांधकाम करुन दुकान उभारण्यात आलेले आहे. विचारणा केल्यावर एसटी महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यालयातून परवानगी मिळाल्याचे सांगण्यात येते. परंतु महामंडळाने परवानगी दिली असली तरी, प्रवास मार्गावरील रस्त्याच्या मधोमध दुकानाचे बांधकाम करणे बेकायदेशीर आहे. बसस्थानकात व्यवसाय करणार्या दुकानदारांनी लाखो रुपये देवुन दुकाने घेतली आहे. परंतु अशा बेकायदेशीर दुकाने उभारण्यात येत असल्याने अधिकृत दुकानदारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणुन अतिक्रमित दुकान शेडला सर्व व्यवसायिक दुकानदारांचा विरोध असुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर प्रकरणासंदर्भात तत्काळ दखल घेवुन बसस्थानकात उभारण्यात येणारे बेकायदेशीर अतिक्रमित शेडचे दुकान त्वरीत काढण्यात यावे. तसेच 24 तासाच्या आत योग्य कार्यवाही न झाल्यास बसस्थानकातील सर्व व्यवसायिक दुकानदार दुकाने बंद ठेवुन रस्त्यावर उतरतील. यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास सर्वस्वी जबाबदारी एसटी महामंडळ नंदुरबार आगाराची असेल, असा इशारा नंदुरबार बसस्थानकातील साईरचना प्लाझा असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ माळी, दर्शन ठक्कर, केदार प्रजापत, मनोज बेलदार, मुस्तफा सुतारवाला, राम ठक्कर, राजू राजपूत आदी दुकानदारांनी निवेदनातूून दिला आहे. निवेदनाची प्रत परिहवन मंत्री, नंदुरबारचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, एसटी महामंडळाचे धुळे विभागीय नियंत्रक, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आली आहे.








