नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी येथे शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून रागाच्या भरात भावानेच भावाच्या भात शेतीला आग लावल्याची घटना घडली आहे.यातसुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी येथील शिवदास गिंबा वसावे व कमलेश गिंबा वसावे यांच्यात शेतीच्या हिस्से वाटणीच्या कारणावरुन वाद होता. या वादातून शिवदास वसावे यांचे रांझणी गावातील भात पिकाला कमलेश वसावे याने आग लावल्याने एक लाख रुपयांचे शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत शिवदास वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात कमलेश वसावे याच्याविरोधात भादंवि कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश गावित करीत आहेत.








