धुळे l प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2021 कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पाच व्यक्तींनाच प्रवेश असेल, असे जिल्हादंडाधिकारी दिलीप जगदाळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहनांचा समावेश असता कामा नये. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आणि कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशन दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आणि कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचार करण्यास, वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 200 मीटर परिसरात आणण्यास तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात नामनिर्देशन दाखल करतेवेळी पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून धुळे जिल्ह्यासाठी आचारसंहिता कालावधीपर्यंत अंमलात राहील, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. जगदाळे यांनी म्हटले आहे.








