तळोदा | प्रतिनिधी-

कोणतेही गट तट न ठेवता सर्व संघटनांनी एकाच छताखाली येऊन जानेवारीत राजस्थानमध्ये भरणारे २९ वे अखिल भारतीय आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन यशस्वी करावे व त्यासाठी आपले वैचारिक, सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक सदस्य दरबारसिंग पाडवी यांनी केले. तळोदा शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात पश्चिम खानदेश विभागाच्या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. पाडवी बोलत होते.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजीमंत्री पद्माकर वळवी, ज्येष्ठ कवी वाहरू सोनवणे, डोंगर बागूल, सी.के.पाडवी, गोसा पेंटर, साहित्यिक सुनील गायकवाड, जि.प.सदस्य सुहास नाईक, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, नागेश पाडवी, एकता परिषदेचे अध्यक्ष भिमसिंग पवार, दीपक अहिरे, भगवान वळवी, करणसिंग पाडवी, रोहिदास पाडवी, अभिजीत वसावे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जि.प.अध्यक्षा सीमा वळवी यांनी सांगितले, आदिवासींचे निसर्गातील जल, जंगल, जमीन यावर आधारित जीवनाचे जे तत्वज्ञान आहे त्याच नियमांच्या आधारे एकता परिषदेचे कामकाज देखील चालत असते. त्यात एकता परिषदेने नेहमीच शिक्षणावर भर दिला आहे, ते वाढवले पाहिजे असे सांगितले.
दुसरीकडे १४ व १५ जानेवारीला राजस्थानमध्ये अखिल भारतीय आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन भरणार आहे. त्या संमेलनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयारी करावी. नवीन कार्यकर्त्यांनी तयार राहावे. आदिवासी समाजाला भेडसावणार्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. हे महासंमेलन आदिवासींचा कला, संस्कृती, इतिहास, अस्तित्व, आत्मसन्मान, अस्मिता व पर्यावरण सुरक्षा या विषयावर समाजाचे प्रबोधन कार्य करीत असते. त्यामुळे समाजाला एक दिशा देण्याचे कार्य महा संमेलनातून होत असते. त्यामुळे सर्वांनी आदिवासी एकता परिषदेच्या आवाहनाला साद देत महासम्मेलन यशस्वी करण्याचे आवाहन सर्व वक्तयांनी केले. कार्यक्रमात शहादा, नंदुरबार, धुळे, साक्री, अक्कलकुवा, धडगाव आदी ठिकाणाहून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भीमसिंग वळवी यांनी केले.









