नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीचा दीपावली उत्सव कोविड कालावधीत आतापर्यंत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी दीपावलीच्या काळात मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

कोविड 19 संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरीही दिपावली उत्सव हा घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. दिपावली उत्सावादरम्यान कपडे, फटाके, व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी टाळावी, विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, वारवांर हात धुणे, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. कोरोना विषाणूच्या आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी यावर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.
सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले, तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले असल्याने सार्वजनिक कार्यक्रम उदा. दीपावली पहाटसारखे सार्वजनिक उपक्रम किंवा कार्यक्रम आयोजित करताना मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करावे. शक्यतोवर अशा कार्यक्रमाचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करण्यावर भर द्यावा.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे, रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ.आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र सदर ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
वरील कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये आणि कोविड-19 या संसर्गजन्य़ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यावर्षीचा दिपावली शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, सदर परिपत्रक नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा क्षेत्राकरीता लागू राहील कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897,फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.









