शहादा l प्रतिनिधी
सातपुडा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासह शेतकरी सभासदांचे देणे येत्या पंधरा दिवसांचे आत अदा केले जाईल. अपप्रचाराला बळी न पडता शेतकरी-सभासदांच्या मालकीचा सातपुडा सुरू राहण्यासाठी सहकार्य करा. हिरा उद्योग समूहाच्या आर्थिक पाठबळावर कार्यक्षेत्रातील नोंद व बिगर नोंदीचा सुमारे सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार अग्नि बॉयलर प्रदीपन प्रसंगी चेअरमन दीपक पाटील यांनी व्यक्त केला.
श्री.सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या 47 व्या गाळप हंगाम अग्नी बॉयलर प्रदीपन समारंभानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या माजी अध्यक्षा श्रीमती कमलताई पाटील होत्या. यावेळी हिरा उद्योग समूहाचे प्रा.रवींद्र चौधरी, माजी आ.शिरीष चौधरी, पालिकेचे गटप्रमुख प्रा.मकरंद पाटील जि.प.सदस्या जयश्रीबेन पाटील, सौ.अनिता चौधरी,सौ.वंदना पाटील,सौ.माधवीबेन पाटील, माधव जंगू पाटील, रामचंद्र दशरथ पाटील, सुनिल सखाराम पाटील, रवींद्र रावळ, राजाराम पाटील, जगदीश पाटील, रोहिदास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी विधिवत पूजा व बॉयलर प्रदीपन मान्यवरांसह संचालक मंडळाने केले. तद्नंतर झालेल्या कार्यक्रमात बोलतांना श्री.पाटील म्हणाले, सातपुड्याचे कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. तद्नंतर कारखाना सुरु होणार किंवा नाही याची चर्चा करण्यात येत आहे. ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, कामगारांच्या विकासाचा साथीदार असलेला सातपुडा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. विकासाला विरोध करणाऱ्या काही मोजक्या हीतशत्रुंकडून सातपुडा बंद पडणार असा अपप्रचार केला जात आहे. मात्र,परिसर विकासासाठी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांनी सुरू केलेला ‘सातपुडा’ बंद पडू देणार नाही. हिरा उद्योग समूहाच्या आर्थिक सहकार्यातून येत्या पंधरा दिवसांत ऊस पेमेंट तसेच थकित वेतन अदा केले जाईल. सातपुडा पूर्ण क्षमतेने गाळप करेल. रोज 4 हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून येत्या हंगामात सहा लाख टन उसाचे गाळप करणार. श्री.पाटील, आपल्या सडेतोड व सुस्पष्ट भाषणात पुढे म्हणाले, अपप्रचार करणार्यांची तोंडे वेळीच बंद करा. जशास तसे उत्तर देणे आपली जबाबदारी आहे. आपला मार्ग खडतर असला तरी उद्दिष्टाप्रत आपण पोहोचू हा विश्वास आहे. परिसराचा विकास स्व.अण्णासाहेबांनी उभारलेल्या प्रकल्पांमुळेच होऊ शकला. याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कोणी वेडे-वाकडे बोलत असेल तर त्याचे तोंड वेळीच बंद करा. आपण जे बोलतो ते करतोच. आता मदतीला हिरो उद्योगसमूह आहे. इमानदारी आपल्या सोबत आहे. सभासद व कामगारांचा पैसा न पैसा देऊ.
हिरा उद्योग समूहाचे संचालक प्रा.रवींद्र चौधरी यांचेही समयोचित भाषण झाले. ते म्हणाले, नफा-नुकसानीचा विचार न करता स्व.अण्णासाहेबांच्या कुटुंबाशी असलेले स्नेहसंबंध वृद्धिंगत होण्यासाठी सातपुड्याला आर्थिक पाठबळ देत आहोत. कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करत लक्ष्यांक पूर्ण करेल.
याप्रसंगी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले. आभार शेतकरी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी व्यक्त केले.