तळोदा l प्रतिनिधी-
तळोदा तालुक्यातील मोरवड येथील युवक धानोरा येथील बहिणीला भेटण्यासाठी जात असणाऱ्या युवकांना बिबट्या दिसल्याने जीव वाचविण्यासाठी दुचाकी घेऊन पळालेल्या युवकांची दुचाकी स्लिप झाल्याने भयभीत युवक जखमी झाले. त्यामुळे त्यांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सविस्तर घटना अशी की, मोरवड ते धानोरा रस्त्यावर संध्याकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान धानोरा येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दगा लिंबा पाटिल व राहुल नरोत्तम पाटील यांना अचानक डोळ्यासमोर बिबट्याचे दर्शन झाले. अंधाऱ्या रात्री चक्क काळोखात बिबट्याचे डोळे चमकले आणि दुचाकीच्या लाईटच्या प्रकाशात बिबट्याच्या अंगावरील पट्टे दिसून आले. त्यामुळे दुचाकीस्वाराच्या अंगाला काटे येऊन, पूर्णपणे भयभीत झाल्याने दुचाकीचा तोल सुटला. आपल्या मागे बिबट्या पाठलाग करत तर नाही ना, ह्या विचाराने त्यांच्या मनात घर केलं आणि भयभीत झालेल्या युवकांचा जीव मुठीत घेऊन, दुचाकीची गती व मनात बिबट्याची भीती असल्याने दुचाकी एका खड्यात आदळल्याने ती घसरून पडली व दुचाकी घसरल्याने दोघीही युवक जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या पायाला, हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे. हा थरार संध्याकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान घडला असून संबंधित जखमी रुग्णांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित युवकांना कमी प्रमाणात दुखापत असल्याने त्यांची प्रकृती चांगली असल्याचे कळते. संबंधित युवकांना भयभीत झालेले बघून, परिसरातील लोकांमध्ये व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदरील घटना वनविभागाला कळताच वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वासुदेव माळी, विरसिंग पावरा, विजय पाटील, आर.जे.शिरसाठ, ज्योती खूपे कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करत उपाययोजना करण्यात आल्या.