नवापूर | प्रतिनिधी
येथील सीमा तपासणी नाक्यावर तीन युवकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून मोटर वाहन निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तिन्ही संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील मोटर वाहन निरीक्षक अतुल रमेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार बेडकी ता. नवापूर येथील तपासणी नाक्यावर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने मोटर वाहन निरीक्षक यांनी दोन्ही अवजड वाहन( ट्राला क्र.आर.जे.१४, जी.एल . ३४२६ व आर.जे.१४,जी.के.२७२६ ) याट्रालांना पुन्हा वजन करून आणा असे सांगितले मात्र अरविंद गावीत, उल्हास गावित, मोना गावित रा.बेडकी, ता. नवापूर) या तीन युवकांनी ३१ ऑक्टोबर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुरत राष्ट्रीय महामार्ग वरील बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर सार्वजनिक ठिकाणी यात हस्तक्षेप करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ट्राला यांच्या चालकांवर कायदेशीर कारवाई करीत असल्याचा कारणावरून अरेरावी केली. दोन्ही वाहनांचे वजन केले असता सदर दोन्ही ट्रेलर मंजूर भार पेक्षा जास्त वजनाच्या आढळून आले. त्यामुळे आरटीओ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत असताना संबंधित आरोपी यांनी फिर्यादी यांच्या जवळ येवून आम्ही सदर वाहन पास केलेले आहे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सोडून द्या असे सांगत फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन तुम्ही नोकरी कशी करतात असे धमकावून फिर्यादीचे मनात दहशत निर्माण करून फिर्यादी हे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करित आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी घटनास्थळी पावणे पाचला भेट दिली.








