नंदुरबार l प्रतिनिधी-
पेट्रोल डिझेलचे अवास्तव दरवाढ हेच का अच्छे दिन असा संतप्त सवाल करीत युवा सेनेच्यावतीने बैलगाडीवर गॅस ठेऊन शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.


केंद्र सरकारतर्फे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्य जनता कोरोना, दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक संकटात असताना सततच्या होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झालेले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व सचिव वरून देसाई यांच्या आदेशान्वये आज शहरात युवासेनेच्या पदाधिकार्यांच्यावतीने पेट्रोल– डिझेल दरवाढ व महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी बैलगाडीसह सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता मंगळ बाजारातील पेट्रोल पंपापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी बैलगाड्यावर गॅस सिलेंडर ठेवत युवा शिवसैनिकांनी सायकल रॅली शहरातून विविध भागात मिरवली. नेहरू पुतळ्याजवळ रॅली आल्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीमध्ये युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, जिल्हा उपप्रमुख रविंद्र गिरासे, माजी नगरसेवक अर्जुन मराठे, युवती सेना जिल्हाधिकारी मालती वळवी, युवासेना तालुका अधिकारी समाधान पाटील, युवासेना शहर आधिकारी दादा कोळी,युवती सेना अधिकारी काजल मच्छले, दिनेश भोपे, घारु कोळी, लखन माळी, आनंदा पाटील, प्रफुल खैरनार, दिग्विजय पाटील, गोविंदा चौधरी, सुरज मराठे आदींनी सहभाग घेतला.









