नंदुरबार l प्रतिनिधी
म्हसावद येथून पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून फरार झालेल्या चोरीच्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जिल्ह्यातील सावदा येथून ४८ तासाच्या आत अटक केली.असून त्याला म्हसावद पोलिसांच्या ताब्यात दिले
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 20 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7.30 वा . सुमारास शहादा पोलीस ठाण्यातील चोरीच्या अटकेतील आरोपी राजा कपुरदास बैरागी रा . आमोदे ता . शिरपुर जि . धुळे यास ग्रामीण रुग्णालय , म्हसावद येथे नियमीत वैद्यकिय तपासणी करीता आणले असता आरोपी हा पोलीसांच्या हाताला झटका मारुन ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथून पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून फरार झाला होता.याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
घडलेला प्रकार अतिशय गंभीर होता , म्हणून पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अमंलदारांचे तसेच शहादा पोलीस ठाणे आणि म्हसावद पोलीस ठाणे यांचे वेगवेगळे 5 पथक तयार केले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेची पथके शिरपुर , धुळे , नागपुर येथे रवाना केले . समाज माध्यमांवर देखील आरोपीचा फोटो व त्याबाबत माहिती प्रसारीत करण्यात आली , परंतु कोणत्याही पथकाला आरोपी ताब्यात घेणेबाबत यश मिळत नव्हते . एका अनोळखीने दि.21 ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना एका फोनद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीसांच्या ताब्यातुन पळालेला आरोपी सारखाच दिसणारा एक इसम जळगांव येथे फिरत असल्याचे सांगितले , परंतु त्याने इतर कोणतीही उपयुक्त माहिती दिली नाही . या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक जळगांव येथे रवाना केले . मिळालेली माहिती अतिशय त्रोटक स्वरुपाची होती त्यामुळे पथकाला आरोपीताचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जिल्ह्यातील सावदा येथे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दि. 23 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर झोपलेला स्थितीत होता , परंतु त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो पळुन जावू लागला . त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले व नंदुरबार येथे आणून पूढील कारवाईकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे , विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.








