नंदुरबार l प्रतिनिधी-
संतश्री दगाजी बापू यांच्या जन्मस्थान चौपाळे (ता. नंदुरबार) येथून नर्मदा नदीपर्यंत दरवर्षी आयोजित करण्यात येणारी पायी दिंडी यंदाही उत्साहात सुरू असून दिनांक २३ मार्च ते ३० मार्च २०२६ दरम्यान ही पदयात्रा पार पडत आहे. गुजरात राज्यातील नर्मदा किनाऱ्यावर जलसमाधी स्थळापर्यंत जाणारी ही दिंडी भाविकांसाठी श्रद्धा आणि सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे.
या पदयात्रेदरम्यान सहभागी भाविकांसाठी ठिकठिकाणी अन्नदान, फराळ, लस्सी, ताक तसेच खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. अनेक दाते स्वयंस्फूर्तीने सेवा देत असताना, ज्या ठिकाणी दाते उपलब्ध नसतात, तेथे दिंडी ट्रस्टतर्फे भाविकांची भोजन व निवासाची व्यवस्था केली जाते. यंदाचे दिंडीचे हे ३३वे वर्ष असून संतश्री दगाजी बापू यांच्या कृपेने, संतश्री संतोष चेतन बापू यांच्या नेतृत्वात तसेच दगाजी बापू पदयात्रा दिंडी ट्रस्टचे अध्यक्ष लालचंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा यशस्वीरित्या सुरू आहे. संतश्री दादाजी बापू यांच्या आशीर्वादाने यात्रेला अधिक आध्यात्मिक उर्जा लाभत असल्याचे भाविकांनी सांगितले.
पदयात्रेदरम्यान सकाळी राजपिपला (गुजरात) येथे सेवा फ्रूट सप्लायरतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष लालचंद्र राठोड यांच्यासह रनाळा येथील धनराज धनगर, किशोर राठोड, शरद राठोड, राजू पवार, बापू माळी आदी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात शनिमांडळ येथील भाविकांनी वाहनाद्वारे फराळाची व्यवस्था केली.
दरम्यान, ३१ मार्च रोजी गुजरातमधील नर्मदा तीरावर या पायी दिंडीची सांगता होणार असून नर्मदा पूजनानंतर सर्व भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही दिंडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे.







