नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक स्थैर्याबरोबरच आदिवासी व मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्याचा थेट फायदा नंदुरबार जिल्ह्याला होणार आहे, असे मत माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केले. नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
डॉ. गावित म्हणाल्या की, देशाची अर्थव्यवस्था सात टक्क्यांहून अधिक विकासदर राखत पुढे जात असून भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोविडनंतर वाढलेली वित्तीय तूट साडेचार टक्क्यांच्या आत आणण्यात केंद्र सरकारला यश आले असून कर्ज-ते-जीडीपी प्रमाणातही सुधारणा झाली आहे. ही बाब मजबूत अर्थव्यवस्थेचे द्योतक आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमधून महाराष्ट्राला सुमारे एक लाख कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. नव्या कर-वाटप सूत्रामुळे राज्याच्या वाट्याला १५ ते २० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार असून यामुळे नंदुरबारसारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा आणि विकासकामांना चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित) शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याची घोषणा स्वागतार्ह असून नंदुरबार जिल्ह्यात हे वसतिगृह मंजूर व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. गावित यांनी सांगितले. तसेच तापी व नर्मदा नदी खोऱ्यातील मासेमारी व्यवसायासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निधीमुळे केज प्रकल्पांना बळ मिळणार आहे.
एमएसएमई क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या १० हजार कोटी रुपयांच्या ग्रोथ फंडाचा लाभ नवापूर औद्योगिक क्षेत्रासह महिला प्रक्रिया उद्योगांना होईल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीमुळे जिल्ह्यातील रखडलेली रस्ते कामे पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कर्करोगासह गंभीर आजारांवरील औषधांवरील आयात शुल्क रद्द केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णांना आर्थिक दिलासा मिळेल. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, सिंचन, हरित उद्योग, आरोग्य, शिक्षण व वाहतूक क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदी महाराष्ट्राच्या विकासाला गती देणाऱ्या ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.








