नंदुरबार l प्रतिनिधी-
जागतिक आर्थिक मंच दावोस 2026 मध्ये भारताची ठोस व प्रभावी उपस्थिती नोंदवली जात असताना, त्याचे सकारात्मक प्रतिबिंब थेट नंदुरबार जिल्ह्याच्या विकासावर उमटताना दिसत आहे. जागतिक पातळीवर गुंतवणूक, अर्थकारण आणि विकासावर होत असलेल्या चर्चांमधून नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यांसाठी नवीन संधींची दारे खुली झाली आहेत.
विशेष म्हणजे, १९६० नंतर प्रथमच नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ४ हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येत असून, ही जिल्ह्याच्या औद्योगिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारी घटना आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या या गुंतवणुकीमुळे नंदुरबारमध्ये रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास, स्थानिक उद्योगांना चालना आणि आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विकासाभिमुख धोरणांचा लाभ आता थेट नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांपर्यंत पोहोचत आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, राज्याचा विकास केवळ शहरी भागापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक जिल्ह्याचा आर्थिक सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्हानिहाय आर्थिक कामगिरीचे मोजमाप (benchmarking) करून मागास भागांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जात आहेत.
दावोससारख्या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विकासाची मांडणी होत असताना, नंदुरबार आता ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. औद्योगिक गुंतवणूक, जागतिक कंपन्यांचा विश्वास आणि शासनाचे सक्षम नेतृत्व—या त्रिसूत्रीमुळे नंदुरबार जिल्हा विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.
दावोस 2026 मधील भारताची उपस्थिती केवळ राष्ट्रीय प्रतिष्ठेपुरती मर्यादित न राहता, नंदुरबारसारख्या जिल्ह्यांसाठी आशा, संधी आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक ठरत आहे.








