नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर विविध प्रकारची विकासकामे प्रभावीपणे सुरू आहेत. गावांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण विषयक अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अभियानाला अधिक बळ मिळावे, ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कामांना प्रोत्साहन मिळावे तसेच लोकसहभाग वाढावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दि. 20 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याला भेट देणार आहेत.
त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्या शहादा तालुक्यातील जयनगर व बामखेडा तसेच नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर येथील ग्रामपंचायतींना भेट देणार असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. यावेळी त्या ग्रामपंचायत प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीमुळे ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या विकासकामांना नवी प्रेरणा मिळणार असून महिला, युवक व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या भेटीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होऊन ग्रामविकासाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे.








