नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार पालिका निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आता 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी पालिका प्रशासन आणि निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सौ. रत्नाताई रघुवंशी व भाजपाचे अविनाश माळी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत असून 18 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उद्या मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
नंदुरबार पालिकेसाठी 11 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणतः 2 तासांत अर्थात 12 वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.
नंदुरबार पालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. लागलीच दुसऱ्या दिवशी अर्थात 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार होती; परंतु निवडणूक आयोगाने निर्णय बदलून २१ डिसेंबर रोजी मतमोजणीचा निर्णय घेतल्याने निकालाची प्रतीक्षा लांबली आहे. आता रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. आधीच इव्हीएम पालिकांच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, टपाली आणि इव्हीएममधील मतमोजणी त्या-त्या पालिकांच्या प्रभाग संख्येनुसार नियोजित फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. एकीकडे जशी निकालाची तारीख जवळ येत आहे तशी उमेदवारांमधील चलबिचलता वाढली असल्याने लक्ष लागून आहे.
नंदुरबार नगरपरिषदेत १,११,१०१ मतदारांपैकी ७५,०८१ मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का ६७.५८ टक्के इतका आहे. नंदुरबार पालिकेसाठी वीस प्रभागांत 41 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नंदुरबारातील प्रभागांची संख्या २० असून, एकूण प्रभागांतील मतदान केंद्रांची संख्या १३१ आहे आणि प्रत्येक केंद्राच्या मतमोजणी फेऱ्या मतदारांच्या संख्येनुसार होतील. प्रथम फेरी १ व २ प्रभागांची, नंतर ९ व्या फेरीपर्यंत प्रत्येकी २ प्रभागांची मतमोजणी केली जाईल.
१० वी फेरी १९ प्रभाग, ११ वी फेरी प्रभाग क्र. २०, याप्रमाणे मतमोजणी ३ करण्यात येणार आहे. एकूण ११ फेऱ्या होणार असून, टेबलांची संख्या १३ राहणार आहे. एक टेबल टपाली मतदानासाठी राहणार आहे.नंदुरबारात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक २ येथे मतमोजणी केली जाणार आहे.
सर्वच पक्षांतर्फे विजयाचा दावा केला जात असला तरी निकालानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. या निवडणुकीत आ.डॉ. विजयकुमार गावित व आ. चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.








