जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध
नंदुरबार – प्रतिनिधी
बदललेल्या वातावरणात साहित्यिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे विचारपूर्वक शब्द मांडून आपल्या साहित्याची रचना करावी, असे प्रतिपादन साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य डॉ.नरेंद्र पाठक यांनी केले.
मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ तर्फे श्रीजी वाचनालयाच्या आरोग्य महोत्सवानिमित्त आज कन्यादान मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर भावसार अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ठाणे येथील गीतेश शिंदे, युवा कादंबरीकरण प्रवीण पवार, ग्रंथालय अधिकारी धर्मसिंग वळवी, पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, श्री जी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी, संयोजक शशिकांत घासकडबी, स्वागत कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, व्यवस्था प्रमुख दीपक कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्रंथदिंडीने प्रारंभ
युवा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हुतात्मा चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. के.डी गावित संस्थेतर्फे आदिवासी नृत्य, अभिनव विद्यालयातर्फे लेझीम पथक, श्रॉफ विद्यालयाचे झांज पथक, डी.आर. आणि एकलव्य विद्यालयाचे राष्ट्र पुरुष आदि या दिंडीत सहभागी झाले होते.
पुस्तक प्रकाशन
यावेळी प्राचार्य रमेश भाई शहा यांच्या जीवनावर आधारित तेजोमय भाई या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे एक अभिनव शैक्षणिक प्रयोग सिंहावलोकन (हिंदी अनुवाद) प्रा.डॉ.उमेश शिंदे , शोधलेख प्रा.डॉ. उमेश शिंदे, अमृतकुंभ (ललित लेख संग्रह) डॉ.मालिनी आढाव, इकोज फ्रॉम द सायलेंट चंद्रशेखर चौधरी, काही कथा काही व्यथा डॉ. विवेक वैदय या पुस्तकांचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
परिसंवाद
या साहित्य संमेलनात मराठी भाषेचा अभ्यास रोजगाराच्या संधी या विषयावर संवाद झाला. ठाणे येथील निकिता भागवत अध्यक्षस्थानी होत्या. यात डॉ. गिरीश पवार, आशिष वाणी, रणजीत राजपूत यांनी सहभाग घेतला. डॉ. माधव कदम यांनी संचलन केले. नागसेन पेंढारकर यांनी आभार मानले. विकसित भारतात मराठी साहित्याचे योगदान या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष स्थानिक ज्येष्ठ संपादक सूर्यभान राजपूत होते. ऋषिका गावित, मधुरा डांगे, रोहित माळी, प्रीतम निकम यांनी सहभाग नोंदवला. डॉ. विवेक वैद्य यांनी संचलन केले. सुलभा महिरे यांनी आभार मानले.
कवी कट्टा
साहित्य संमेलनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील ज्येष्ठ कवी गीते शिंदे होते. यात 50 कवींनी सहभाग नोंदवला. प्रशांत बागुल, डॉ. गिरीश पवार यांनी संचलन केले.
समारोप
अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील होते. स्वागताध्यक्ष संदीप चौधरी यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले. छाया संगीत विद्यालयाच्या संचालिका संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवतींनी स्वागत गीत म्हटले. डॉ. श्रीराम दाऊदखाने यांच्या पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.
याप्रसंगी आर.आर. शहा यांच्या स्मृती निमित्त गौरीशंकर धुमाळ यांनी जीवनपट पत्रिका लेखन केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण दाभाडे, संतोष पाटील, गिरीश पवार यांनी केले.








