नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी गावाच्या शिवारात वृद्धास जीवेठार मारणाऱ्या महिलेस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी गावाचे शिवारात कंजाला नदी जवळ फरशीखाली एका पुरुषाचे प्रेत पडलेले दिसले. या माहितीवरुन तेथील कुंडी गावाचे पोलीस पाटील रजनिकांत वसावे घटनास्थळी गेले असता तेथे त्यांना अंदाजे ७० वर्षीय वयोवृध्द पुरुष रक्तबंबाळ अवस्थेत मयत स्थितीत दिसला होता. त्यावरुन पोलीस पाटील वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यास सदरची माहिती दिली. त्यावरुन अक्कलकुवा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे व त्यांचे पथक घटनास्थळी हजर झाले. मयता जवळील मिळून आलेल्या मोबाईलवरुन पोलीसांना मयताची ओळख पटविण्यास मदत झाली होती. मयताचे नाव धिरुभाई छोटुलाल तडवी (वय ७० रा. बारेजा जि. अहमदाबाद गुजरात) असे निष्पन्न झाले होते. त्यान्वये फिर्यादी रजनिकांत वसावे यांचे फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलीस ठाणेत भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांनी केला असता तपासावरुन असे निष्पन्न झाले की, मयत धिरुभाई वी भाटयाफळी, कोराई येथील रुमाबाई अरुण पाडवी हिच्याकडे राहत होते.
त्यांच्यात शेतजमीनीच्या पैश्यांवरुन वाद असल्याने रुमाबाई हिने तिच्या घराजवळ राहणारा विष्णु प्रल्हाद कापुरे याचे मदतीने दि. २६ एप्रिल २०१९ रोजी वृध्दास जिवेठार मारल्याचे पोलीस
तपासात निष्पन्न झाले होते. आरोपी विष्णु प्रल्हाद कापुरे व रुमाबाई अरुण पाडवी (दोन्ही रा. कोराई खापर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) यांना तपास अधिकारी यांनी तात्काळ अटक करत तपासाअंती महत्वाचे पुरावे जमा केले होते. आरोपींविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायालय, शहादा येथे सादर केले होते. खटल्याची सुनावणी अति सत्र न्यायाधीश,एस. सी. पठारे यांचे समक्ष झाली. खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत.
यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी क्र. २ रुमाबाई अरुण पाडवी विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने तिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी भा.द.वि.क. – ३०२, २०१ अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.








