नंदुरबार l प्रतिनिधी-
भाजपात डॉक्टर हिना गावित यांचे जोरदार पुनरागमन होताच अक्कलकुवा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी चालवली असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांना या पक्षांतराचा पहिला धक्का बसला आहे. आमदार आमश्या पाडवी यांचे सुरुवातीपासून खंदे समर्थक असलेले काकडखुंट ग्रामपंचायतचे सरपंच विनोद वळवी, सोनापाटी ग्रामपंचायतचे सरपंच कुवरसिंग पाडवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार महा संसद रत्न डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशदादा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात जाहीरपणे भाजपात प्रवेश घेतला. यामुळे शिवसेना शिंदे गटात मोठे खिंडार पडले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या प्रवेश मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी काकडखुंट सरपंच विनोद वळवी व सोनापाटी ग्रामपंचायत सरपंच कुवरसिंग पाडवी यांच्यासह ग्रामपंचायत येथील उपसरपंच सदस्यांसह परिसरातील महुपाडा,लालपुर, शेल्टापाणी , पेचरीदेव परिसरातील हजारो शिवसेना शिंदे गट तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश आमदार आमश्या पाडवी यांना मोठा हादरा देणारा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, राजाराम राव, अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष भूषण पाडवी, मोलगी मंडळ अध्यक्ष आकाश वसावे, माजी सभापती रुषाबाई वळवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, किशोर वळवी ,जयमल पाडवी, धनसिंग वसावे मनीलाल तडवी, रामसिंग वळवी, जगदीश वसावे सरपंच ललिताबाई वळवी सरपंच कल्पनाबाई पाडवी सरपंच चंपाबाई पाडवी सरपंच हेमलता राऊत ,सुनील राऊत, रोशन पाडवी, मिलन वळवी दिलीप वसावे ,किरण पाडवी, नरेश पाडवी ,महेश तंवर ,विनोद कामे आदी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जाहीर भाषणात सांगितले की, माझ्या राजकीय जीवनात कुठलाही भेदभाव न करता मी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने सर्वांना साथ दिली. महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून अधिकाधिक जनकल्याणकारी व विकासात्मक योजना राबवून विकास साधला. यापुढेही जिल्ह्यातील विकासासाठी मी तत्पर आहे. माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी सांगितले की जिल्ह्यासह अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी आणि बिगर आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबवून विकास करणे हेच केवळ माझे ध्येय असून अनेक लोक कल्याणकारी योजना मी राबविल्या आहेत. या तालुक्यातील ठेकेदार कम लोकप्रतिनिधी असलेले विधानसभा सदस्य केवळ आपल्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या वापर करीत असून वेळीच सावधान होणे गरजेचे आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी म्हणाले की स्थानिक विधानसभा लोकप्रतिनिधी केवळ राजकीय सुडभावनेने काम करीत असून केवळ परिवाराच्या स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत. यावेळी काकडखुंट ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनोद वळवी, सरपंच कुवरसिंग पाडवी यांनी देखील आमदार आमश्या पाडवी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.








