चोरी गेलेल्या 5 मोटारसायकली हस्तगत, शहादा पोलीसांची कामगिरी
नंदुरबार l प्रतिनिधी
विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या 5 मोटारसायकली शहादा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटर सायकल ( क्र. एम .एच.39, ए.ए. 4211) ही सोनवद, ता. शहादा येथुन चोरी झाल्याबाबतची फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने शहादा पोलीस ठाणेकडून तपास सुरू असतांना शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त बातमी मिळाली की, वरील गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल ही मंदाणे ता. शहादा येथे कामानिमित्ताने आलेल्या एका इसमाकडे असुन तो सदर वाहन वापरत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांनी लागलीच डी. बी. पथक प्रमुख पोउपनि भुनेश मराठे यांच्या पथकास मिळालेल्या बातमीची खात्री करुन कारवाईकामी रवाना केले.
शहादा पोलीस ठाणे डी. बी. पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने मंदाणे, ता. शहादा येथे जाऊन खात्री केली असता, एक इसम वरील वर्णनाप्रमाणे दुचाकी वाहनासह मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव सुकदेव साईनाथ तडवी रा. बिजरीगव्हाण ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने सदरची मोटारसायकल ही सोनवद, ता. शहादा येथील एका घराचे बाहेरुन चोरी केली असल्याचे सांगितले. सदर इसमास अधिक खोलात जाऊन विचारपुस करता त्याने अजुन काही मोटारसायकली चोरी केल्या असल्याची कबूली दिली. त्यास बाकीच्या चोरी केलेल्या मोटारसायकली कुठे आहेत बाबत विचारता, त्या सोनवद गावाचे एका शेतात लपवून ठेवले असल्याची त्याने सविस्तर माहिती दिली. त्यावरुन शहादा पोलीस ठाणे डी.बी. पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीचे आधारे नमुद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे
अजुन 04 मोटारसायकली मिळून आल्या आहेत. तरी वरील नमुद इसमाकडुन शहादा पोलीसांना 1 लाख 19 हजार रु. किमतीच्या एकूण 5 मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, पोउपनि भुनेश मराठे, पोउपनि प्रदीप राजपूत, पोहेकॉ योगेश थोरात, साहेबराव खांडेकर, दिपक चौधरी, पोकों/ भगवान सावळे, प्रदीप वाघ यांनी केली आहे.