नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात तपासणी दरम्यान कंटेनर मध्ये अवैध दारू आढळून आली. शहादा पोलिसांनी तब्बल 84 लाख 12 हजार रुपये किमतीची मुद्देमाल जप्त केला.
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोंडाईचा सारंगखेडा मार्गे एका लाल रंगाच्या अशोक लेलैंड कंपनीच्या कंटेनर ट्रक मध्ये विदेशी दारुची चोरटी वाहतुक होणार आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी निलेश देसले यांनी पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकास सदर बातमीची खात्री करुन कारवाई कामी रवाना केले.
मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे शहादा पोलीस ठाणे डी. बी. पथक प्रमुख पोउपनि भुनेश मराठे व स्टाफ असे शहादा दोंडाईचा रोडवरील संविधान चौक येथे नाकाबंदी करीत असतांना एक लाल रंगाचे अशोक लेलँड कंपनीचा ट्रक त्यांना येतांना दिसला. सदर ट्रकला हात देउन थांबविण्यात आले असता त्याचा वाहन (क्र.के. ए. 09,ए.बी 0484) असा दिसुन आला. ट्रकवरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुरेश भगीरथराम बिश्नोई रा. अजानीयोकी ढाणी, घोरीमना, जि. बाडमेर, राजस्थान असे सांगितले. त्यास ट्रकमध्ये काय आहे बाबत विचारता तो गोंधळल्या स्थितीत असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागला. त्यावरुन पथकास त्याचेवर अधिकचा संशय बळावल्याने पथकाने वाहनास चेक केले असता त्यामध्ये एकूण 69,12,000/- रुपये किमतीची अवैध बनावट विदेशी दारुचे एकूण 1200 बॉक्स तसेच 15 लाख रुपये किमतीचे वाहन असे जप्त करण्यात आले आहे. त्यावरुन नमुद इसम नामे सुरेश भगीरथराम बिश्नोई रा. अजानीयोकी ढाणी, घोरीमना, जि. बाडमेर, राजस्थान याचेविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे भा.न्या. संहिता कलम 123 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, डी. बी. पथकाचे प्रमुख पोउपनि भुनेश मराठे, पोहेकों/दत्ता बागल, जितेंद्र सुर्यवंशी, पोकों/विक्की शिंपी अशांनी केली आहे.