नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौपा येथे पूर्व वैमनस्यातून तरुणांच्या खून करण्यात आला याप्रकरणी आरोपी त्यांना न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीतील चौपाळे गावातील फिर्यादी संदीप सुभाष कुमावत यांच्या घराच्या बाजूला भालचंद्र दलपत राठोड, सुदाम दलपत बंजारा, राजेंद्र बालचंद्र राठोड आणि ज्ञानेश्वर धनसिंग बंजारा हे राहत असून त्यातील भालचंद्र राठोड यांनी फिर्यादी यांच्या राहते घराच्या वहीवाट असलेल्या गावठाण जागेवर अतिक्रमण करुन घर बांधल्याने वहीवाट रस्ता बंद झाला होता. त्यामुळे फिर्यादीच्या वडीलांनी भालचंद्र राठोड यांच्याविरुध्द नंदुरबार दिवाणी कोर्टात खटला दाखल केला होता. तेव्हापासून वरील सर्व हे किरकोळ कारणावरुन फिर्यादी सोबत वाद घालून “तुझ्या परिवारातील एखादयाचा काटा काढू” अश्या धमक्या देत होते.
4 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 7.45 वा.च्या सुमारास फिर्यादी हे अंगणात बसलेले असतांना भालचंद्र दलपत राठोड, राजेंद्र बालचंद्र राठोड, सुदाम दलपत बंजारा आणि ज्ञानेश्वर धनसिंग बंजारा अशांनी तेथे येत फिर्यादीस शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीतांच्या तावडीतून फिर्यादी यांना सोडविण्यासाठी त्यांचा शालक दिपक प्रकाश कुमावत हा धावत येवून सोडवा-सोडव करु लागला असतांना राजेंद्र बालचंद्र राठोड याने दिपक कुमावत यांच्या गुप्तांगावर जोराने लाथ मारल्याने दिपक जागेवरच खाली पडला. तेव्हा काही गावकऱ्यांनी दिपकला सिव्हील हॉस्पिटल, नंदुरबार येथे उपचाराकरीता दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी दिपक कुमावत यास तपासुन मयत घोषित केले होते. त्यावरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन आरोपीविरुध्द भा.द.वि.क.- 302,323, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने करत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपी भालचंद्र दलपत राठोड, राजेंद्र बालचंद्र राठोड, सुदाम दलपत बंजारा व ज्ञानेश्वर धनसिंग बंजारा यांना तात्काळ अटक करुन सर्व आरोपीतांविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार किशोर पेठकर यांच्या समक्ष झाली. सुनावणी दरम्यान खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी भालचंद्र दलपत राठोड, राजेंद्र बालचंद्र राठोड, सुदाम दलपत बंजारा व ज्ञानेश्वर धनसिंग बंजारा, सर्व
रा.चौपाळे ता.जि. नंदुरबार यांच्याविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार किशोर पेठकर यांनी राजेंद्र बालचंद्र राठोड यास भा.द. वि.क. 304 (Part II) अन्वये दोषी ठरवत 10 वर्ष सश्रम कारावास व रुपये 10,000 दंड तसेच भा.द.वि.क. 323 व 504, 34 अन्वये 2 वर्ष कारावास व रुपये 2000 दंड तसेच आरोपी बालचंद्र दलपत राठोड यास भा.द. वि.क.-323,504,34 अन्वये 2 वर्ष कारावास व रुपये 2000 दंड आ.क्र. सुदाम दलपत बंजारा व ज्ञानेश्वर धनसिंग बंजारा यांना भा.द.वि.क. -323,34 अन्वये । वर्ष कारावास व रुपये 2000 दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. तुषार कापडीया यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पोहेकॉ नितीन साबळे, पोहेकों/पंकज बिरारे आणि टी.एम.सी कक्षाचे पोहेको शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.