नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूका-2025 साठी निवडणूक विभाग व निर्वाचन गण अंतिम प्रभाग जाहीर करण्यात आली असून ही प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती उप जिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या 12 ऑगस्ट 2025 रोजीच्या निर्देशानुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आवश्यक होते. या निर्देशानुसार, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या 19 ऑगस्ट 2025 रोजीच्या पत्रानुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अंतिम निवडणूक विभाग रचनेला तसेच पंचायत समितीच्या अंतिम निर्वाचक गण रचनेला मान्यता देण्यात आली आहे.
या मान्यतेनंतर, जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना ‘परिशिष्ट 8-अ’ व ‘परिशिष्ट 8-ब’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये देखील उपलब्ध आहे, असेही उप जिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.