नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाने जमिनीचे हक्कासंबंधीचे चतुः सीमा, एकत्रीकरण व आकारबंद अशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात ८०० रुपयांची लाच मागितली ती लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे रंगेहाथ अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदारांची शेतजमीन कुकराण, ता. नवापूर गावाच्या वनक्षेत्रात आहे. सदर जमिनीचे हक्कासंबंधीचे चतुः सीमा, एकत्रीकरण व आकारबंद अशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील (वय ३६) याने तक्रारदाराकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी पडताळणी दरम्यान तडजोडअंती ८०० रुपये स्विकारण्याचे पाटील याने मान्य केले. आज दि. १९ ऑगस्ट रोजी नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालय येथे पाटील याने ८०० रुपयांची लाच पंचासमक्ष स्विकारली. याप्रकरणी पाटील
याला ताब्यात घेण्यात आले असून नवापूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याच्या घराची झडती घेण्याची कार्यवाहीदेखील सुरु आहे. त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, हेमंतकुमार महाले, जितेंद्र महाले, पोलीस नाईक सुभाष पावरा यांच्या पथकाने केली.