नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने सलग चार दिवस घेण्यात आलेल्या जम्बो क्रीडा स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण भव्य सोहळ्यात पार पडले. जल्लोष मय वातावरणात पार पडलेल्या या बक्षिसांचे वितरण माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी तालुका अध्यक्ष जे एन पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, उद्योजक शशिकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील, सागर तांबोळी, रवींद्र गिरासे, मुन्ना पाटील, सरपंच विनोद वानखेडे, विजय क्रीडा गौरव समितीचे प्रमुख ईश्वर धामणे, छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त निकुंभ सर, मंत्रालय स्तरीय अधिकारी विलास सवडे आदी मान्यवर उपस्थित होते. काल 15 ऑगस्ट 2025 रोजी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शुभेच्छा देणाऱ्यांनी सकाळपासूनच रीघ लावली होती. ‘आपले साहेब’ असे शब्द लिहिलेले मोठे कट आउटस, विकास कामांच्या डॉक्युमेंटरी दाखवणाऱ्या एलईडी स्क्रीन आणि त्यापुढे उभे राहून सेल्फी काढणारे कार्यकर्त्यांचे जत्थे जल्लोष आणि उल्हास यात विशेष भर घालताना दिसले. त्या जल्लोषमय वातावरणात हे बक्षीस वितरण पार पडले.
दिनांक 10 ऑगस्ट 2025 पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा निर्मितीनंतरच्या 26 वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या. रोप स्किपिंग, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, निबंध स्पर्धा याबरोबरच हॉर्स रायडिंग संबंधित पेंट पेगिंग ही अत्यंत आगळीवेगळी स्पर्धा देखील घेण्यात आली. भाजपाचे युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे यांच्या संकल्पनेतून सकार झालेल्या या स्पर्धेत घोड्यावरील अत्यंत थरारक खेळ स्पर्धकांनी सादर केले. या विविध क्रीडा प्रकारातील विजयी होणाऱ्या 165 खेळाडूंना ट्राफी, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सहभागी होणाऱ्या 1000 हून अधिक क्रीडापटूंना प्रमाणपत्र देण्यात आले. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जिल्हा विकासासाठी केलेल्या कार्यावर आधारित घेण्यात आलेली निबंध स्पर्धा देखील आगळीवेगळी ठरली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जिल्हा विकासाच्या संकल्पना रुजवण्याचे आणि त्यांच्यामध्ये विचार निर्माण करण्याचे अप्रत्यक्ष कार्य घडू शकले. शोभराज खोंडे, धनराज अहिरे, जगदीश बच्छाव , योगेश निकुंभ यांच्यासह विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या समस्त सदस्यांनी परिश्रम घेतले.