सर्वांगीण शिक्षणातून संस्कारक्षम पिढी निर्माण होते : ॲड. माणिकराव कोकाटे
नंदुरबार । प्रतिनिधी
शिक्षण हे दर्जेदार असले पाहिजे त्याचबरोबर ते सर्वांगीण स्वरूपाचे असले पाहिजे, कारण सर्वांगीण शिक्षणातूनच संस्काक्षम पिढी निर्माण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अॅंड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
ते आज तळोदा तालुक्यातील धवळीविहिर येथे मुख्यमंत्री आदर्श शाळा लोकार्पण व सोमावल येथील शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. धवळीविहिर, सोमावल येथे स्वतंत्र झालेल्या कार्यक्रामंना यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अभिजित मोरे, डॉ. शशिकांत वाणी यांच्यासह धवळीविहिर, सोमावल येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्यातील समन्वयातून विकासाच्या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय बदल होवू शकतात. विद्यार्थी दशेतच चांगले शिक्षण आणि संस्कार मिळाले तर एक आदर्श पिढी निर्माणाची प्रक्रिया सुरू होत असते. जिल्ह्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, यासारख्या पायाभूत सुविधांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर निधी उपलब्ध करून दिला जातो आहे.
ते पुढे म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील शिक्षण सुविधांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत 9 शाळांसाठी 12 वर्गखोल्या बांधण्यासाठी 1 कोटी 56 लाख रुपये, तसेच 5 इमारत नसलेल्या शाळांच्या बांधकामासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सेस निधीतून 20 कोटी 50 लाख रुपये मंजूर होऊन 76 शाळांसाठी 115 वर्गखोल्या, तर एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने 6 शाळांसाठी 24 वर्गखोल्या उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, तोरणमाळ येथील निवासी शाळेत काँक्रीट गटार आणि रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात परिसराच्या सर्वांगीण विकासाची गरज, वर्तमान आणि भविष्याच्या अनुषंगाने आमदार राजेश पाडवी व आमदार आमश्या पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.