नंदुरबार l प्रतिनिधी
लोकनेते,माजी आ.स्व बटेसिंगभैय्या रघुवंशी यांनी आदिवासी ग्रामीण भागात शैक्षणिक सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांनी काढलेल्या अनेक शाळांमधील विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यांवर पोहोचलेले आहेत. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील ढेकवद येथे प्रियदर्शनी शैक्षणिक विकास ट्रस्ट संचलित लोकनेते स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी माध्यमिक विद्यालयाचे नामकरण व नूतन इमारतीचे उद्घाटन आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत रघुवंशी होते.
तर व्यासपीठावर उद्योजक मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, तालुका विधायक समितीचे सचिव यशवंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. गणेश पराडके,राष्ट्रवादीचे नेते भरत गावित,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयपालसिंह रावल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील,रमेश गावित, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार सभापती दीपक मराठे, धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा,शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,जि.प माजी सदस्य विजय पराडके, जि.प सदस्य देवमन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित साधावे. त्यांना चांगलं शिक्षण द्यावं. विद्यार्थ्यांनी विविध खेळांच्या माध्यमातून जिल्हास्तर, राज्यस्तर, देश पातळीवर चमकदार कामगिरी करीत शाळेचे नाव उज्वल करावे. यासाठी शिक्षकांनी देखील मार्गदर्शन करावे. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी गावातून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.