नंदुरबार l प्रतिनिधी-
“हर घर तिरंगा – घर घर तिरंगा” या राष्ट्रीय स्तरावरील अभियानाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी भालेर गावामध्ये माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभक्तीने भारलेल्या उत्साहपूर्ण भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. क. पु. पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी 11 वाजता या रॅलीला दिमाखदार प्रारंभ झाला.
या प्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यांच्या हस्ते रॅलीस शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
यावेळी माजी खासदार तथा संसद रत्न डॉ. हिनाताई गावित, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, विद्यालयाचे चेअरमन भास्कर पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, राजे शिवाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी आणि लोटन पाटील, तसेच भालेर गावाचे सरपंच व्यंकट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी भाषणातून सांगितले की, राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याबद्दल प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे. या देशात राहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या देशाचा आपल्या राष्ट्राचा अभिमान बाळगलाच पाहिजे. राष्ट्राला, समाजाला समर्पित होऊन आपले दैनंदिन कार्य पार पाडणे म्हणजेच खरी देशभक्ती होय, असेही डॉक्टर गावित म्हणाले.
या रॅलीत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली दरम्यान देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण गाव देशप्रेमाने निनादत होते. ही रॅली केवळ एक मिरवणूक नसून, गावकऱ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागवणारा आणि तिरंग्याविषयी अभिमान निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.