नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार लोकनेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव समितीच्या वतीने निबंध लेखन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. विकासाची दिशा ठरवणाऱ्या विचारांना चालना देणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरली. एकलव्य विद्यालयासह विविध शाळांमधील 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला व डॉ.विजयकुमार गावित यांनी केलेल्या विकास कार्यावर लेखन केले.
एकलव्य विद्यालय, नंदुरबार येथे स्पर्धेचे उद्घाटन पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांच्या हस्ते झाले. सोबत प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर, समन्वयक सुनील चौधरी, ईश्वर धामणे, बळवंत निकम तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. गिरीश पवार यांची उपस्थिती कार्यक्रमास अधिक भारदस्त करून गेली.
स्पर्धकांची दमदार उपस्थिती लाभली. एकलव्य विद्यालय, नंदुरबार येथे एकूण ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, विचारांची गती आणि सर्जनशीलतेचा आविष्कार घडवला. नववी ते बारावी या गटांसाठी तीन महत्त्वाचे विषय देण्यात आले
1. डॉ. गावित यांच्या नेतृत्वातील जिल्हा विकास,
2. “माझा जिल्हा आणि त्यांचे योगदान”,
3. रस्ते, जल आणि आरोग्य विकास या संदर्भातील कार्य.
या विषयांवर विद्यार्थ्यांनी ठोस आणि विचारपूर्वक मांडणी केली. काही निबंध तर प्रशासकीय अभ्यासकांनाही विचार करायला लावणारे ठरले. याचबरोबर श्रॉफ हायस्कूल, अभिनव विद्यालय, एस ए मिशन हायस्कूल, डी आर हायस्कूल, जिजामाता विद्यालय, राजे शिवाजी विद्यालय येथेही याचप्रमाणे निबंध स्पर्धा पार पडल्या आणि शेकड विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उद्घाटनपर भाषणात डॉ. सुहास नटावदकर यांनी सर्जनशील लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले. “जिल्ह्याच्या विकासाची दिशा ही युवकांच्या विचारांतून घडते. ही स्पर्धा म्हणजे भविष्याच्या निर्मितीची पहिली पायरी,” असे ठाम उद्गार त्यांनी काढले. त्यांनी विद्यार्थ्यांना डोळसपणे विचार करीत, वास्तवाशी जुळवून मुद्देसूद मांडणी करण्याचे आवाहन केले.
प्रा. ईश्वर धामणे यांनी डॉ. गावित यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा थोडक्यात पण ठसकेबाज परिचय देत स्पर्धेच्या हेतूची स्पष्टता निर्माण केली. प्रा. गिरीश पवार यांच्या संयोजनाखाली संपूर्ण कार्यक्रम अचूकपणे पार पडला. प्रा. चंद्रकांत देसले, किरण देहणकर, श्रावण हुबाळे यांनी नियोजन, पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन यामध्ये कसोशीने मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता प्रा. योगेश ठाकरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
ही निबंध स्पर्धा केवळ लेखनापुरती मर्यादित नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या मनात विकासाची बीजे रोवणारी होती. लोकनेते विजयकुमार गावित यांच्या कार्याविषयी मंथन घडवणारी होती.