नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याचे लाडके नेते, नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती आयोजित जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचा नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत यांच्या हस्ते आज शानदार शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बुद्धिबळात निपुण असलेल्या लहानग्या विद्यार्थ्यांसमवेत बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळण्याचा आनंद घेत डॉक्टर हिनाताई आणि डॉक्टर सुप्रियाताई यांनी सर्व स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला. त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ करताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी चेंडूची पहिली खेळी खेळताच उपस्थित स्पर्धकांनी एकच जल्लोष केला.
दिनांक 10 ऑगस्ट 2025 पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीनंतरच्या 26 वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा क्रीडा महोत्सव नंदुरबारमधील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. दरम्यान, आज नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धा 2025 चा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, प्राध्यापक युवराज पाटील, विजय क्रीडा गौरव समितीचे प्रमुख तथा क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे, बळवंत निकम, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, जगदीश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी तसेच खेळाडू उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांनी एका मागून एक सादर केलेल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित विद्यार्थी जल्लोष करताना दिसले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी भाषणातून सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आभार मानले व क्रीडा गुण कौशल्य वाढीस लागण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया ताई गावित यांनी विजय क्रीडा महोत्सव समितीचे कार्य आणि नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आ. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसनीय शब्दात मनोगत व्यक्त केले.
बुद्धिबळ स्पर्धा १२, १४ आणि १९ वर्षांआतील वयोगटासाठी आणि आंतराष्ट्रीय मानांकनप्राप्त रेटेड खेळाडूंसह १९ वर्षांवरील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटांत स्पर्धा झाली. स्पर्धेचे प्रमुख म्हणून शोभराज खोंडे यांनी जबाबदारी पार पाडली, तर पंच म्हणून अश्वमेघराज खोंडे, सागर महाजन, विनीत बागुल, प्रणव सूर्यवंशी, वैष्णवी महाजन, नंदिनी बागुल, शैला पाटील, गीतेश महाजन, रुचिता गोरे, मयूर सूर्यवंशी आदींनी काम पाहिले. स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 280 खेळाडूंचा सहभाग होता स्पर्धा 4 गटात खेळविण्यात आले
व्हॉलीबॉल स्पर्धा आज आणि उद्या अशा दोन दिवस चालणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी होईल. १८ वर्षांवरील गटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी ही स्पर्धा राहील.