नंदुरबार l प्रतिनिधी
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शासनाच्या हर घर तिरंगा 2025 या उपक्रमाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे विविध देशभक्तीपर आणि सर्जनशील उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच स्थानिक नागरिकांनीही उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून राष्ट्रप्रेमाची साक्ष दिली.
सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन, मैदानावर उभे राहून एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक तिरंगा कलाकृती साकारली. हा नजारा पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांनी देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पोस्टर्सची निर्मिती केली. यात भारताचा इतिहास, स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदाने, राष्ट्रीय एकता आणि तिरंग्याचे महत्व अशा विविध विषयांवर कल्पकतेने संदेश मांडले गेले. तसेच तिरंगा रांगोळी या विषयावर घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
याशिवाय, प्रत्येक वर्गाच्या गटागटातून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध प्रेरणादायी पूर्ती गीते देशभक्तीपर गीते समूहगीते सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणे, स्वातंत्र्य दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता एक उत्सव म्हणून समाजात साजरा व्हावा आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर व जागरूकता निर्माण करणे हा होता. शासनाच्या हर घर तिरंगा मोहिमेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे उपक्रम प्रभावी ठरले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन विद्यालयाच्या प्राचार्य नूतनवर्षा राजेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विजय पवार पर्यवेक्षक मीनल वळवी पर्यवेक्षिका वंदना जांभीरसा तसेच ज्येष्ठ शिक्षक अरुण गर्गे, अविनाश सोनेरी, सतीश सदाराव, प्रसाद दीक्षित, खुशाल शर्मा,गौतम सोनवणे यासह सर्व शिक्षकवृंद, शाळा समिती सदस्य व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेत, देशभक्तीचा संदेश प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवला.