नंदुरबार l प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही व राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय परिपत्रकान्वये केले आहे.
*राष्ट्रध्वज वापराबाबत आवश्यक सूचना:*
• *प्लास्टिकच्या ध्वजांवर बंदी:* शासनाच्या 22 ऑगस्ट 2007 च्या परिपत्रकानुसार, राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका, आणि ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर होणार नाही व अशा वापरास पायबंद घालण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
• *कागदी ध्वजांचा वापर:* जनतेने वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजांचा वापर करावा.
• *योग्य सन्मान राखणे:* स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर वापरले जाणारे राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी टाकले जाऊ नयेत याची काळजी घेण्याचे घ्यावी.
• *खराब झालेल्या ध्वजांची विल्हेवाट:* खराब झालेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक आणि ध्वज संहितेतील तरतुदींनुसार नष्ट करावेत.
• *कायदेशीर कारवाई:*
प्लास्टिकचे ध्वज विकताना आढळल्यास, संबंधितांवर ध्वज संहितेतील तरतुदींनुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास, राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 च्या कलम 2 नुसार कारवाई केली जाईल.
सर्व शासकीय, निमशासकीय, आणि खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये, आरोग्य संस्था, आणि पोलीस यंत्रणा यांनी प्लास्टिकच्या ध्वजांचा वापर टाळावा आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी परिपत्रकानुसार कळविले आहे.