नंदुरबार l प्रतिनिधी
9 ऑगस्ट 2025 रोजी विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी तसेच विविध मंडळांकडून घेण्यात येणारे मिरवणुक कार्यक्रम शांततेत पार पडावे, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आज अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नंदुरबार येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी शहर तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंडळांचे तसेच संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांना मार्गदर्शनपर सुचना केल्या असुन त्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणुक तसेच विविध कार्यक्रमात सहभागी मंडळांनी मिरवणुक मार्ग तसेच कार्यक्रमाचे वेळेत ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, मिरवणुकीत आपले स्वयंसेवक नेमावेत, मिरवणुक कार्यक्रमात मदय पिवून कोणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी, त्याचप्रमाणे मिरवणुक कार्यक्रमादरम्यान इतर समाजाच्या भावना दुखावतील अशी आक्षेपार्ह बॅनर, प्रतिमा, झेंडे, घोषणाबाजी, भाषण इत्यादी करणार नाही, याबाबतची काळजी संबंधित मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.
त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसीबल पेक्षा जास्त आवाज करुन ध्वनी प्रदुषण होणार नाही याची देखील खबरदारी घेणे आवश्यक असुन मिरवणूकीत कोणीही प्राणघातक शस्त्रे सोबत आणणार नाहीत, याबाबतची दक्षता संबंधित मंडळांचे पदाधिकाऱ्यांनी घ्यावी याबाबत संजय महाजन यांनी सुचना केल्या. सदर बैठकित उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्व मिरवणूका व कार्यक्रम शांततेत पार पडतील अशी यावेळी ग्वाही दिली आहे.
सदर बैठकीला संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार शहर, राहुल वाघ मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार, हेमंतकुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे, किरणकुमार खेडकर पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस ठाणे, राजेश वळवी, अध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तसेच विविध मंडळांचे 90 ते 100 पदाधिकारी व सदस्य असे उपस्थित होते.