नंदुरबार l प्रतिनिधी-
आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नाही; असे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी पुन्हा स्पष्ट केले. त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय होणार असा विश्वास देखील व्यक्त केला.
अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी व्यापक सहविचार सभा पार पडली. त्या सभेत मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित बोलत होते. सभेला अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेला प्रतिसाद अत्यंत उल्लेखनीय होता. अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्षपणे घडवलेले हे शक्ती प्रदर्शन ठरले.
उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले, अवैध गैरप्रकार करणे आमच्या विरोधकांची सवय आहे त्यामुळे विविध चौकशीच्या जाळ्यात ते अडकले असून आमच्या विरोधातील लोकप्रतिनिधी लवकरच मोठ्या अडचणीत आलेले दिसतील, असे नमूद करुन पुढे सांगितले की, महायुतीचे घटक असतानाही आमच्या विरोधात काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांबद्दल पक्षाच्या वरिष्ठांकडे जाऊन स्पष्टपणे कल्पना देऊन झाली आहे. महायुतीच्या विरोधातील त्यांच्या कामाची संपूर्ण माहिती आम्ही दिली आहे. आगामी निवडणुकीत आपण स्वबळावरची भूमिका कशासाठी घेत आहोत,
हे देखील स्पष्ट करून झाले आहे. लोकसभा आणि विधानसभेत महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्यानेच स्वबळावर लढण्याचा हा निर्णय घेतला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकामध्ये कुठल्याही प्रकारे युती करण्यात येणार नाही. तथापि पक्षाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडेल. जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार; असं वक्तव्य माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. आम्ही आमची शक्ती फक्त आणि फक्त पक्षासाठी वापरत आलो आहोत आणि पक्ष वाढीसाठीच लावणार आहोत; असे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.
माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सहविचार सभेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप वसावे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वळवी, भाजपाचे तालुका अध्यक्ष नितेश वळवी,
धनसिंग वसावे,महेश तवर, उमेश पाडवी, रोहित शुक्ला, भूषण पाडवी, भूपेंद्र पाडवी यांच्या सह सुनील पाडवी, सुधीर पाडवी, अशोक राऊत दिलीप वसावे रामसिंग वळवी, रुषाताई वळवी, आशाताई पाडवी, दीप्ती ताई वळवी, रोशन पाडवी, बबुवा राणा, राजू तडवी, विशाल तडवी जगदीश वसावे हिलाल वळवी, वीरसिंग वळवी, आपसिंग पाडवी, भीमसिंग तडवी, आकाश वसावे, नवलसिंग वळवी, आशिष वळवी, पांडुरंग वळवी आधी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रमुख सहभाग होता.