नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील घरकुलांच्या जागेचा प्रश्न सुटला असून त्यासाठी सुमारे दहा एकर इतकी शासकीय जागा उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर दहा एकर खाजगी जागा उपलब्ध करण्याची प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात शहरातील सर्व आदिवासी बेघरांना घरे देण्याचे नियोजन होणार असून शहरातील सुमारे 500 आदिवासी बेघर नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात 30 जुलै रोजी दुपारी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या व जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल योजनेची आढावा बैठक पार पडली. त्यानंतर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही माहिती दिली. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, शहरातील सर्व बेघर नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच आज आढावा बैठक घेण्यात आली.
आदिवासी बेघरांची शहरातील संख्या जवळपास 500 आहे पंधरा दिवसात त्यांच्या घरकुला विषयीचे नियोजन पूर्णत्वास येणार असल्यामुळे नक्कीच त्यांना दिलासा मिळेल. तळोदा येथील बारगळ यांच्या जमिनीच्या वादामुळे रखडलेल्या घरकुलांविषयी बोलताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, तळोदा येथील या घरकुला विषयी सुद्धा आजच्या आढावा बैठकीत आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तोही मुद्दा मार्गी लावला आहे. बारगळ यांच्याशी चर्चा पूर्ण झाली असून घरकुलांना जागा देण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सरकारी खर्चाने त्या संबंधित सर्व घरकुल अर्ज धारकांना मोजणी करून मिळणार आहे.
दरम्यान, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, नंदुरबार तहसीलदार जगताप, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत घरकुलाच्या लाभार्थ्यांना जागेसंदर्भात विचारणा करण्यात आली. तसेच अतिक्रमित जागेवर घरकुल साठी जागा कशी उपलब्ध होईल या विषयावर चर्चा पार पडली. घरकुल लाभार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणीत संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांना केल्या.