नंदुरबार l प्रतिनिधी-
मकर संक्रांतीच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात 7 जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीपासून 21 जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत कलम 37 (1) (3) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
मागील काही दिवसांत जिल्ह्यातील जातीय संवेदनशीलता व अशांततेच्या घटनांचा विचार करता कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नंदुरबार शहरासह नवापूर, शहादा, अक्कलकुवा व तळोदा ही शहरे संवेदनशिल क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील कोणत्याहील इसमास कोणत्याही प्रकारची हत्यारे, ज्वलनशिल किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे मनाई राहील, सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त भाषणे, घोषणाबाजी, गाणी, वाद्ये वाजविणे किंवा शांतता भंग करणारे कृत्य निषिद्ध राहील, पाच किंवा अधिक लोकांच्या जमावास मनाई, यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पूर्व परवानगीची अट लागू राहील, तसेच विशेष परवानगीशिवाय सभा, मोर्चे किंवा मिरवणूक काढण्यास मनाई राहील.
अपवादात्मक बाब म्हणून वृद्ध, अपंग व्यक्ती आणि लाठीचा आधार घेणाऱ्या नागरिकांसाठी, सरकारी/निमसरकारी अधिकारी व कर्मचारी, त्यांचे कर्तव्य पार पाडताना व लग्न समारंभ, प्रेतयात्रा, आठवडे बाजार, न्यायालयीन कामे आणि शासकीय कर्तव्याशी संबंधित लोकांना यामध्ये सूट राहील.
स्थानिक पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल. संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परवानगी दिल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे