नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तथापि विरोधात कोणताही प्रभावी उमेदवार नसणे आणि तीस वर्षाच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाचे रचलेले ऐतिहासिक कार्य लोकांच्या समोर असणे, या दोन गोष्टी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या जमेच्या ठरल्या असून गावातील कॉर्नर सभांमधून त्यावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे अडीच वर्षापासून आदिवासी विकास खाते आहे. याच्यापूर्वी देखील सलग पाच वर्षे त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून कार्य केले. त्या संपूर्ण कार्यकाळात वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या राबवलेल्या योजना महाराष्ट्रभर चर्चेत राहिल्या. स्थानिक शेतकऱ्यांना मिळवून दिलेली वीज माफी, पिक विमा योजना, कृषी सहाय्य, तापी बुराई आणि तत्सम पाणी प्रकल्पांना दिलेली गती, महिला बचत गटाच्या माध्यमातून गावागावात सुरू झालेले गृह उद्योग, ठक्कर बाप्पा सारखे योजनांमधून प्रत्येक गावात झालेले रस्ते आणि काँक्रिटीकरण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या सवलती, भांडे वाटप सुरक्षा संच वाटप आणि लाडकी बहीण योजनेचे लाभ अशा अनेक कामांमुळे डॉक्टर विजयकुमार गावित यांचं नेतृत्व ठळक राहिले आणि सध्या निवडणूक रणधुमाळीत हाच मुद्दा चर्चेचा बनला आहे.
दरम्यान कॉर्नर सभांमधून विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी सांगितले की, आम्ही तीस वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा लोकांना तोंडी पाठ आहे. जिल्हा निर्मिती केली, रस्ते धरण बंधारे पूर्ण करण्याबरोबरच शेती विकास केला. हे करत असतानाच शेतकऱ्यांना गायी, बकऱ्या दिल्या, महिलांना गृह उद्योग दिले, गरिबांना घरे दिली, इतकच नाही तर भांडे गॅस सुरक्षा संच हे पण आमच्य प्रयत्नांमुळे लोकांना सरकारकडून मिळाले. हे सर्व मतदारांना माहिती आहे त्यामुळे आम्ही तीस वर्षात काय केलं असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांना लोक निश्चितच जागा दाखवतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या कॉर्नर सभांमधून बोलताना व्यक्त केला.
उमर्दे खुर्द, वडवद, भालेर, नगाव, तीसी, काकर्दे, जुनमोहिदा, हाटमोहिदा, खापरखेडा, नाशिंदे, शिंदगव्हाण, कानळदा, विखरण, बोराळा, सुजालपुर, कोरीट, सावळदे, समशेरपूरआणि अन्य गावांमधील मतदारांशी संपर्क साधला तसेच कॉर्नर सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे भाषणात डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी तुमची केवळ दिशाभूल केली. भूलथपा देत गेले. दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट दिले जातील असे म्हणाले होते. तुम्हाला खटाखट पैसे मिळाले का? त्याच्या उलट मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार आपल्या शब्दांवर ठाम आहे भूमिकेवर ठाम आहे. मोदी सरकारने सांगितले होते आरक्षण हटवणार नाही सत्ता आल्यानंतर त्यांनी आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि याच्यापुढेही लागणार नाही. राज्यातील महायुती सरकार लाडक्या बहिणींना पैसे देत आहे, पिक विमा विज बिल माफी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहे त्याच्या व्यतिरिक्त गावागावात पाणी योजना रस्ते वीज दिली जात आहे.
म्हणून यापुढे मतदारांनी भुलथापांना बळी पडू नये; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले. लोकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास यापुढेही चालू राहील आणि त्या कामाच्या बळावर निश्चितच आमचा विजय होणार आहे; असाही विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.