नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दिनांक 10 नोव्हेंबर, 2024 रोजी नंदुरबार शहरातील 20 केंद्रावर आयोजित केली जाणार असुन सकाळ सत्रात 9 परीक्षा केंद्रावर 3639 तर दुपार सत्रात 11 परीक्षा केंद्रांवर 4212 असे एकूण 7851 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
यासाठी जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, गृह शाखेचे पोलीस उप अधिक्षक पाटील, डायट प्राचार्य भारती बेलन, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी तथा सर्व परीक्षा केंद्रांचे केंद्रसंचालक प्राचार्य उपस्थित होते.
बैठकीत परीक्षेसाठी परिरक्षक, सहाय्यक परिरक्षक व केंद्रसंचालक नियुक्त करणे, आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देणे, गोपनिय साहित्य शासकीय कोषागारात ठेवणे, आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देणे, प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसी टिव्ही, उमेदवार तपासणी करीता फिंगरप्रिन्ट व फेस स्कॅनर यंत्रणा कार्यान्वीत करणे या विषयांवर सविस्तर चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी परीक्षा विषयक कामकाजाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबतची दक्षता घेणाच्या सूचना जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिल्या.
तसेच पोलीस विभागाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.
बैठकीनंतर सादरीकरणाद्वारे झोनल अधिकारी असलेले गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक परीरक्षक शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रसंचालक म्हणुन नेमणूक दिलेले शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे सादरीकरण माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी केले. तसेच समारोप पर मनोगतात परीक्षे विषयक महत्वपूर्ण माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी दिली.