नंदुरबार l प्रतिनिधी
पहिले मतदान केंद्र मनिबेली व नर्मदा नदी काठावरील चिमलखेडी, डनेल, मुखडी या गावातील अतिदुर्गम मतदान केंद्रांची जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी पाहणी केली.
यावेळी तळोद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर अक्कलकुवा तहसीलदार विनायक घुमरे, ग्राम महसुल अधिकारी प्रभाकर पाडवी पाऊल कोकणी तसेच लतिका राजपूत, चेतन साळवे यांच्यासह परिसरातील नागरिक हेही त्यांच्या भेटीदरम्यान उपस्थित होते.
नर्मदा नदी काठावरील महाराष्ट्रातील पहिले मतदान केंद्र मनिबेली व नर्मदा नदी काठावरील चिमलखेडी, डनेल, मुखडी या गावातील अतिदुर्गम मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती डॉ. सेठी यांनी नर्मदा नदीकाठावर स्थित असलेल्या मनिबेली व डनेल येथील जीवनशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या.
जीवनशाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ही मतदान केंद्रे अतिदुर्गम भागातील असल्याने तेथील स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या तेथील अडीअडचणींची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी करून घेतली. सायंकाळी मांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सुविधांचीही त्यांनी पाहणी केली.