नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.भीती आणि भयाच्या सावटातून मुक्त होण्यासाठी नवरात्रोत्सवातील महिषासुर मर्दिनी स्तोत्र गायनाने नवीन चैतन्य प्रेरणा मिळत असल्याचे उद्गार मुख्याध्यापिका सौ सुषमा शाह यांनी कार्यक्रमाप्रसंगी काढले.
पर्जन्यधारा लुप्त होणे म्हणजे अश्विन.पाऊस निरोप घेत असताना शरद ऋतूचीसुरूवात थंडीची चाहूल देऊन जातो. अश्विन महिन्याच्या या शरद ऋतू काळात शक्ती आराधना करण्याची प्राचीन रिति भारतात आहे. ही शक्ती आराधना अश्विन महिन्याच्या सुरुवातीलाच नवरात्र उत्सवम्हणून साजरा करण्याची परंपरा भारतीय हिंदू समाज वर्गामध्ये आहे. दुर्ग नावाच्या असुराला वध करणाऱ्या देवी दुर्गाच्या उपासनेला या काळात मोठे महत्त्व आहे.
कर्तृत्वाची, ज्ञान साधनेची नवी शक्ती विद्यार्थ्यांमध्ये संचारावी. सर्व प्रकारच्या भयभीतीचा नाश व्हावा म्हणून शारदीय नवरात्र उत्सव श्रॉफ हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
काव्यांजली राजपूत,रितिका खलाणे, ऋचा राजपूत,मंजिरी निर्मल,पूर्वांजली ठाकूर, हर्षिता मोरे, समीक्षा सनेर, ऋतिका शिंदे, कार्तिकी महाजन विद्यार्थिनींनी देवीच्याशैलपुत्री,ब्रह्मचारिणी ,चंद्रघंटा,कुष्मांडा,स्कंदमाता,कात्यायनी,कालरात्र,महागौरी,सिद्धिदात्री याविविध रूपांचे साभिनय सादरीकरण केले. शिक्षिका सौ.गिता महाजन व सौ आशा राजपूत यांनी या देवीच्या रूप प्रतिकांना बसवून घेतले.
यावेळी अईगिरी नंदिनी हे महिषासुरमर्दिनी हे स्तोत्र अकराशे विद्यार्थ्यांनी गायन केले. स्तोत्र गायनातून अनोखी ऊर्जा प्राप्त होत असल्याचा भाव यावेळी प्रकट झाला.देवीचा गोंधळ जागर विद्यार्थ्यांनी केला. स्तोत्र गायनाला साथ म्हणून मंत्रमुग्ध शंखनाद कु.भाग्यश्री मिस्री व चि.आदित्य पटेल यांनी केला. तबला साथ चि.मोहित वारूडे याने केली. गीतांचे सादरीकरण संगीत शिक्षिका सौ. अनघा जोशी यांनी करवून घेतले.
शिक्षक भिकू त्रिवेदी यांनी सर्व देवांनी स्तुती केलेले शक्रादय स्तोत्र विद्यार्थ्यांसमोर सादर केले. मुख्याध्यापक सौ. सुषमा शाह यांनी नऊ देवींचे औक्षण करून शक्ती, बुद्धीची आराधना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत भाषा अभ्यासक योगेश शास्त्री यांनी केले.सौ.सीमा पाटील, जगदीश पाटील उपस्थित होते. कामाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे संयोजन व रचना उपमुख्याध्यापक राजेश शाह यांनी केले.