नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णसेवेला सार्वजनिक आरोग्य विभागाने चालना देत मोलगी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा दिलेला आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या धडगाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्या मेळाव्यात शिवसेनेचे नेते खा.डॉ श्रीकांत शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असतांना संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी ग्रामस्थांना उपचारासाठी सोय व्हावी यासाठी मोलगी ग्रामीण रुग्णालयात खाटांची वाढीव मागणी केली होती.
त्याचवेळी खा. शिंदे यांनी आश्वासित केल्यानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय काढून मोलगी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा देत 20 खाटांची वाढीव मंजुरी दिलेली आहे. यापूर्वी रुग्णालयात 30 खाटांची सोय करण्यात आलेली होती आता 50 खाट रुग्णसेवेसाठी सज्ज आहेत. शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जि.प सदस्य विजय पराडके,जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,अक्राणी पं.स उपसभापती भाईदास अत्रे,धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा,जि.प सदस्य रवींद्र पराडके,युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत.
विशेष बाब म्हणून शासन निर्णयान्वये मोलगी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा देण्यात आला आहे. रुग्णालयासाठी जागा अधिग्रहित करून बांधकाम करण्यात येईल त्याचप्रमाणे पदस्थापना देखील करण्यात येणार आहे.