तळोदा l प्रतिनिधी-
तळोदा तालुक्यातील पुनर्वसित झालेला कुटुंबातील रोजवा प्लॉट येथील रहिवासी अनुष्का जेलसिंग पाडवी ३ वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढवत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळेस आरडा ओरड केल्यामुळे बिबट्या तीस सोडून पसार झाला. अधिक रक्त स्त्राव झाल्यामुळे व मानेला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारा दरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे. २८ दिवसात बिबट्याचा हल्यात मयत झाल्याची तिसरी घटना घडली आहे. तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे, मानवासह पाळीव प्राण्यांवर बिबटयाच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी सकाळी पहाटे आई झोपडीत झाडू मारत असताना काही अंतरावर ३ वर्षीय अनुष्का पाडवी ही बालिका खेळत होती. बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. आई सोबतच कुटुंबातील इतर सदस्यांनी आवाज ऐकताच कुटुंबातील सदस्यांनी आरडा ओरड करत पाठलाग केला. दरम्यान बिबट्याने बालिकेस जखमी अवस्थेत सोडून पळ काढला. सदर बालिका ही गंभीर जखमी असल्याने तिला नंदुरबार येथे हलवण्यात आले होते. नंदुरबार येथे उपचार सुरू असताना तिला जबर मानेवर डोक्यावर मार लागल्यामुळे व ओरबडल्यामुळे रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. २८ दिवसात बिबट्याचा हा चौथा हल्ला असून यात ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या दुदैवी घटने बाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. घटना कळताच तात्काळ वन विभगाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले असून घटनास्थळी पिंजरा लावला आहे. बिबट्यांच्या वाढत्या वास्तव्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. दिवसेंदिवस तालुक्यातील शेत शिवारात मानव-बिबट्याचा संघर्ष वाढीस लागत आहेत. त्यामुळे तळोदा तालुक्यात व शेतात राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.
घडलेल्या घटनेनंतर वनविभागाच्या माध्यमातून बिबट्या पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरा पाठविण्यात आला होता मात्र या पिंजऱ्यात शिकार ठेवण्यासाठी त्यांनी पीडित कुटुंबाकडून बकरीची मागणी केल्यामुळे संतप्त जमावाकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.
तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात त्याचप्रमाणे तळोदा शहरातील नवीन वसाहतींच्या हद्दीपर्यंत बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. गेल्या महिन्यात चिनोदा येथील एका आठ वर्षांच्या बालकाचा तसेच काजीपूर येथे ६० वर्षीय प्रौढ महिलेसह तिच्या नातवाच्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गुरे कुत्रे पाळीव प्राणी हल्ले नियमित घटना झाली असून रविवारी रोझवा प्लॉट येथे 3 वर्षीय अनुष्काचा बळी गेल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..