नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत माहे जानेवारी 2024 ते जुलै 2024 या कालावधीत नंदुरबार क्षयरोग विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यामार्फत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
नंदुरबार क्षयरोग विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधण्याच्या निर्देशांकात संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे आहे.
क्षयरोग विभागाने माहे जानेवारी 2024 ते जुलै 2024 या कालावधीत 56223 संशयित क्षयरुग्ण शोधलेले असून सदर सर्व रुग्णांची क्षयरोगाची तपासणी करून घेण्यात आलेली आहे.
सदर निर्देशांकाअंतर्गत प्रति एक लाख लोकसंख्येला 3400 संशयित क्षयरुग्ण शोधावयाचे उद्दिष्ट दिलेले असताना नंदुरबार जिल्ह्यात प्रति एक लाख लोकसंख्येला 4556 संशयित क्षय रुग्ण शोधण्यात आले.
त्यासाठी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार व सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने दुर्गम व अति जोखमीच्या भागात मोबाईल एक्स-रे व्हॅनद्वारे जास्तीत जास्त संशयित रुग्णांची एक्स-रे तपासणी करून घेण्यात आली. तसेच सदर रुग्णांचे थुंकी नमुने देखील प्रयोगशाळेत तपासून घेण्यात आले.
त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील क्षयरोग विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सर्व आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.