नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील खेतिया पोलीसांनी 9 ऑगस्ट शुक्रवारी मध्यरात्री एका पेट्रोलपंपाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ताब्यात घेतले असून त्यापैकी सात जण महाराष्ट्रातील आहेत.टोळी कडून हत्यारे जप्त करण्यात आले असून त्यात एका संशयिताकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. हे पिस्तूल शहादा येथून तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षकांच्या राहत्या घरातून सन २०२२ मध्ये चोरीला गेली होती. दोन वर्षानंतर या पिस्तूलचा उलगडा झाला आहे.मात्र चोरीला गेलेले ३० काडतूस अद्यापही मिळालेले नाही.दोन वर्षात या पिस्तुलचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला गेला याचा उलगडा आता पोलिसांकडून होणार आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील खेतिया पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री एका पेट्रोलपंपाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी घेराबंदी करुन दरोड्याची योजना आखतांना संशयीतांना अटक केली. यामध्ये रोहीत दिलीप गावित रा. चिंचपाडा, ता. नवापूर, विष्णू जयसिंग चौधरी रा. तोरणमाळ, ता. अक्राणी , अमोल ईश्वर गावित रा.सेतगाव, ता. नवापूर, करण राजेश नाईक रा. तोरणमाळ, ता. अक्राणी, रेमा उर्फ रमेश उर्फ त्रिशूलबाबा सोहजा जमरे रा. काजलमाता ह.मु. शिवटेकडी, पानसेमल यांच्यासह तोरणमाळ येथील दोन अल्पवयीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
एक व्यक्ती अंधारात पोलिसांच्या तावडीतून निसटला. पळून जाणारा संशयीत बबलू उर्फ अलीखान अफजल पठाण रा. सप्तश्रृंगीमाता मंदीर, शहादा, ह.मु. तोरणमाळ ता. अक्राणी)आहे. या संशयिताकडून मध्यप्रदेश पोलीसांनी ९ एम.एम. शासकीय पिस्तुलासह, २ चाकु, टॉमी, हतोडी, दांदुके, अर्टीगा कार, पाच मोबाईल असे ९ लाख ३१ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.आठपैकी सात संशयित महाराष्ट्रातील आहे.
पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल दरोडेखोराच्या हाती
सारंगखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी हे शहादा शहरातील विजयनगर येथे वास्तव्यास होते.२०२२ मध्ये सुट्यांमध्ये ते आपल्या कुटुंबासमवेत गावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला टाकत एक शासकीय सर्विस पिस्टलसह ३० जिवंत काडतुस यांसह एक लाख १२ हजार रुपये रोख तसेच ५० हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण एक लाख ६२ रुपयांचा ऐवज लंपास केले होते .दरम्यान महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील खेतिया पोलीसांनी शुक्रवारी दरोडा टाकण्याच्या तयारीत असेलेल्या 7 जणांना अटक केली.
त्यातील नवापूरमधील चिंचपाड्याचा रहिवाशी असणाऱ्या रोहीत दिलीप गावित याच्याकडे हे ९ एम.एम. शासकीय पिस्तुल आढळून आले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी शासकीय पिस्तुलाच्या चोरीने नंदुरबार पोलीसांची अब्रु चव्हाट्यावर आली होती. मध्यप्रदेश पोलिसांच्या कामगिरीने पिस्तूल सापडले असले तरी गेल्या दोन वर्षांत संशयिताने या पिस्तूलचा नेमका कोणत्या गुन्ह्यात वापर केला? याचा उलगडा होण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, पिस्तूल आढळून आलेल्या संशयिताची अधिक तपासासाठी खेतिया पोलिसांकडून शहादा पोलीस मागणी करण्याची शक्यता आहे.पोलिस अधिकाऱ्याची चोरीला गेलेली पिस्तूल आढळली मात्र ३० काडतुसांचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.