नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची तत्काळ हकालपट्टी करा या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले मात्र पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रहार संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लखीमपूर येथील शेतकरी बांधव रस्त्यावर काळे झेंडे घेऊन निषेध करीत असताना केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकर्यांवर रोष व्यक्त करत आपल्या ताब्यातील स्वतःच्या मालकीच्या गाड्यांनी चार ते पाच शेतकर्यांना चिरडून टाकून अमानुषतेचा कळस गाठला असून आशिष मिश्राला जरी उत्तर प्रदेश पोलीसांनी पाच दिवसानंतर अटक केली असली तरी जोपर्यंत त्यांचे वडील केंद्रीय गृहराज्य मंत्री या पदावर कार्यरत आहेत, तोपर्यंत संबंधित घटनेची चौकशी निपक्षपाती होऊन शहीद झालेल्या शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणे दुरापास्त आहे. लखीमपूर घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांची त्वरीत हकालपट्टी करुन शेतकर्यांच्या भावना समजून घ्या. अन्यथा केंद्र सरकार व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अजून देशातील शेतकर्यांसह प्रहार शेतकरी संघटना एकजुटीने आदोलन तीव्र करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील उपाध्यक्ष रवींद्र वळवी तालुकाध्यक्ष योगेश पाटील प्रताप पाटील जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णदास पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








