नंदुरबार l प्रतिनिधी
अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि महात्मा फुले महामंडळाच्या योजनांचा लाभ एकत्रितपणे आदिवासी विकास विभागाच्या शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून एकत्रितपणे देण्याला आजपासून शुभारंभ करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते लाभधारकांना वाहन देऊन या योजनेचा नंदुरबार येथे शुभारंभ करण्यात आला.
याविषयी अधिक माहिती देताना आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांच्या उथनासाठी आणि विकासासाठी विविध योजना आजपर्यंत आपण राबवत आलो आहोत बेरोजगार तरुणांना रोजगार देऊन स्वबळावर उभे करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्याचे धोरण त्याच दृष्टिकोनातून अमलात आणले जात आहे शबरी वित्तीय महामंडळाच्या वतीने विविध प्रकारचे वाहन खरेदीसाठी वित्त पुरवठा सुरू करण्यात आला असून त्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
केंद्र शासनाच्या एन एफ सी डी सी च्या माध्यमातून केंद्र सरकार चार टक्के व्याजाने ट्रॅक्स टेम्पो जीप अशा वाहनांसाठी कर्ज देत असते या वाहनांप्रमाणेच बेरोजगारांना वेगवेगळे व्यवसाय करायला सहाय्य देत असते. शबरी वित्तीय महामंडळही त्यावर दोन टक्के व्याज आकारते. एन एस एफ डी सी ही केंद्राची योजना आहे. महात्मा फुले कॉर्पोरेशन अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि अन्य राज्य शासनाच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या वर्षापासून महामंडळाच्या त्या योजना एकत्रितपणे शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून राबवणे या वर्षापासून लागू करण्यात आले.
आदिवासी विकास विभागाने शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून आज त्या अंतर्गतच पहिले वाहनांचे वाटप सुरू केले. पंधरा दिवस यासाठी लोकांनी अर्ज करायचे आहे आणि पंधरा तारखेच्या नंतर आपण 15 दिवसांमध्ये लाभार्थ्याची निवड केली जाईल, असेही नामदार डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.