नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील कोपर्ली येथून वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य सर्पमित्र मोहित राजेंद्र देसले यांना सचीन चौधरी यांचा फोन आला की, शेतातील झोपडीत मोठा साप आहे. म्हणून सर्पमित्र देसले व राजकुमार कोळी यांनी त्या ठीकाणी धाव घेतली व पाहणी केली असता तेथे त्यांना भारतीय अजगर हा साप आढळून आला. त्याला व्यवस्थित पकडुन नंदुरबार वनविभागात त्यांची नोंद करण्यात आली.
यावेळी वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल बिलाल शाह उपस्थित होते. वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सर्पमित्र संजय वानखेडे, चेतन आखाडे, कैलास देसाई, राहुल खैरनार, तुकाराम पाटील, खंडू ठाकरे, सुपडु चव्हाण, बिराळे बापु यांनी अजगर सापाला लांब त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोळुन दिले.
अजगर या सापाबद्दल अधिक माहिती देताना सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सांगितले की, हा पकडलेला अजगर साधारणपणे ६ ते ७ फुट आहे. अजगर (Rock Python) हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागात अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर नॅकॉंडा म्हणून ओळखले जातात.
पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मीटरपर्यंत तर घेर २५ सेंमी. आढळला आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्टपणे दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडेसुद्धा असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते. जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मीलनकाळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी ८-१०० अंडी घालते.
पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. शरीराचे आकुंचन-प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांसाठी ऊब निर्माण करते, अशी सविस्तर माहिती सर्पमित्र संजय वानखेडे (८८०५७०७९१९) यांनी यावेळी दिली.