नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाभरामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व इतर अनेक योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचारप्रश्र्नी सर्वपक्षीय नेत्यांनी रणशिंग फुंकले असून, 16 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याच्या इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. आंदोलनात 10 हजार पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्या लोकसभेत मांडणार आहे अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खा.ॲड गोवाल पाडवी यांनी केले आहे.
यावेळी खा.पाडवी म्हणाले, गत काही कालावधीपासून जिल्हा परिषदेत योजनांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झालेली आहे. जलजीवन सारख्या महत्त्वकांशी योजनेत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी 16 जुलैला आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे.सर्वसामान्य नागरिकांची जलजीवन मिशन योजना असल्याने लोकसभेत मुद्दा उपस्थित करू
नंदुरबार नगरपरिषदेचा स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृहात गुरुवारी खा.ॲड गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक,सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी आदी उपस्थित होते.
*… तर जेलमध्ये जायला तयार; माजी आ.उदेसिंग पाडवी*
कुठलाही सण उत्सव, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती नसतांना जिल्हा प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी मनाई आदेश जारी केला होता.आता मनाई आदेश जारी केला तरी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असा इशारा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिला.
*लोकप्रतिनिधींच्या घरून ‘प्र.मा’; अभिजीत पाटील*
बांधकाम व इतर विभागातील कामांच्या अतिशय महत्त्वाच्या प्रशासकीय मान्यतेच्या मूळ नकला मुख्य कार्यालय व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींच्या घरून वितरित होत आहेत.कृषी विभागांतर्गत झालेल्या सौरदिव्यांच्या निविदा प्रक्रियेत देखील अनियमितता झाली असून,त्याची चौकशी व्हावी.
*अभिजीत पाटील, सभापती, बाजार समिती शहादा*
*आंदोलन सुरूच राहू देऊ*
कुठलीही योजना जनतेने दिलेल्या करातून राबविण्यात येत असते. योजनेत जनतेची दिशाभूल झालेली आहे. त्यामुळेजोपर्यंत जल जीवन मिशन योजनेच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहू देऊ.
*ॲड राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख, शिवसेना*