नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावर भोणे फाट्याच्यावर असलेल्या भगदाड बुजवण्याचे मागणीसाठी भगदाडची पूजा करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.
नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग 6 वरील भोणे फाट्याजवळ असलेल्या पुलावर मोठे भगदाड पडले असून या ठिकाणी एखाद्या दिवशी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आली होती परंतु दुरुस्ती केल्यानंतर देखील या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे,या रस्त्यावरून दिवसाला शेकडो वाहनांचा प्रवास होतो.
या रस्त्यालगत असणाऱ्या वसाहतींमधील लहान मुलं तसेच विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करत असतात जर एखादा विद्यार्थी या खड्ड्यात कोसळला तर त्याला जबाबदार कोण ? सदर विभागाचे डोळे उघडावे म्हणून धुळे रस्त्यावरील या खड्ड्यांची पूजा करत सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांचा निषेध या ठिकाणी करण्यात आला.येत्या आठ दिवसात जर या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आली नाही तर याच भगदाड जवळ बसून यापेक्षा मोठ्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांमार्फत आंदोलन करण्यात येईल. सदर आंदोलन स्थळी सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत, भीमसिंग राजपूत,अशोक गांगुर्डे उपस्थित होते.